October 2012


आज काल ती फुले वेचत नाही,
पारिजातकाचं झाड तिला आवडत नाही,
आशीच बसुन आसते कुठेतरी,
पुस्तकात डोका खुपसून,
एकटक बघत, पापणी सुद्धा हलत नाही,
वाचत काहीच नसते बहुतेक,
उगाच चिडेल म्हणुन मीही काही म्हणत नाही.

आज काल ती पाउसात भिजत नाही,
गारांचा पाउस बघुनही आनंदानं नाचत नाही,
सर आली की चिखल होईल म्हणुन चिडते, 
नुसतीच येरझार्‍या घालत बसते,
का कोण जाणे आज काल खळखळुन हसत नाही,
गुलाबाच्या पाकळ्या काढत बसते,
गालावर ओघळला तरी अश्रु पुसत नाही.

आज काल गुणगुणं ऐकु येत नाही,
गच्चीवरच्या झोपळ्यावर अलिकडे ती गात नाही,
बसुन राहते गच्चीत एकटीच,
दुपार जाते, सांयकाळ होते,
आधांरलं कितीही तरी आता घाबरत नाही,
झोपाळ्याच्या कड्या वाजत राहतात अधुनमधून
पण दबलेला हुंदका बाहेर येत नाही.

आज काल ती गांवाकडे येत नाही,
मी जावुन आलो तरी "काय खाऊ आणला?" विचारत नाही,
पाउलही न वाजवता दरवाज्यात येते,
दार उघडून वार्‍यासारखी निघुन जाते,
चुकुनही गावकडची चौकशी करत नाही,
मीच तिच्या हातात लाडु ठेवतो,
तासन्तास तो हातातला लाडु संपत नाही.

ती घडघडून काही बोलत नाही,
आणि मीही खोदुन खोदुन विचारत नाही.

– अमृता माणगांवकर

वर्ख स्वप्नावरी माझ्या, तुझ्या आसवांचा
मज कळला नाही ग, गंध चंदनाचा

का बंध बनावा हा काक-कोकिळेचा?
का खेळ आहे आसा ग अजोड-जोडण्याचा?

विधीचा दोष नाही, मानतो खरे हे,
चूक माझीच ग, वेडाचार नेणतेपणाचा

ह्रदयीचे गूज तुझ्या आसवात वाहले,
तरी मज न समजला ग, अर्थ स्पंदनांचा

प्रेम केले मीही, नव्हता आव फुकाचा
आजही मनी सडा ग तुझ्या आठवांचा

निशब्द: टिपातून गळते हिच एक खंत,
अनादर झाला ग मजकडून, तुझ्या भावनांचा

– अमृता माणगांवकर